नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. टी-२० विश्वचषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यामुळे भारतात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. भारताच्या विजयाचा हिरो किंग कोहलीने तमाम भारतीयांची दिवाळी गोड केली. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी विराट कोहलीच्या या खेळीचे कौतुक केले आहे. राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी देखील कोहलीच्या या अप्रतिम खेळीचे कौतुक केले आहे. अशातच एका सनदी अधिकाऱ्याचे ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
दरम्यान, आपण भारत-पाकिस्तान सामना पाहिला तेव्हा विराट कोहलीच्या खेळीने प्रभावित झालो असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले. तसेच कोहलीकडून ५ महत्त्वाच्या बाबी शिकण्यासारख्या आहेत असेही त्यांनी सांगितले. खरं तर आयएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक ट्विट केले आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी कोहलीकडून शिकण्यासारख्या ५ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
विराट कोहलीच्या खेळीतून काय धडे घ्यायचे -
- तुमचा वाईट काळही कायमचा नसतो.
- फक्त तुमच्या कामगिरीनेच उत्तर दिले जाऊ शकते.
- शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.
- लोकांची स्मरणशक्ती खूपच कमी असते.
- जेव्हा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा कठीण प्रसंगही सोपे वाटू लागतात.
विराट कोहलीने शानदार खेळी करून आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे किंग कोहलीची तमाम भारतीयांसाठी हिरो ठरला असून त्याच्या खेळीमुळेच आपली दिवाळी गोड झाली असल्याचे त्याची पत्नी अनुष्का शर्माने म्हटले. अनुष्का शर्माने एक भावनिक पोस्ट लिहून कोहलीच्या खेळीचे अभिनंदन केले.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"