Mitchell Starc Record Took A 5 Wicket Haul In Just 15 Deliveries : वेस्ट इंडिज विरुद्ध जमैका येथील सबिना पार्क, किंगस्टनच्या मैदानात आपल्या कसोटी कारकिर्दीतील शतकी सामना खेळताना ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कनं कहर केला आहे. टेस्टमधील बेस्ट स्पेल टाकताना त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धा कॅरेबियन संघ तंबूत धाडला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जलदगतीने त्याने ५ विकेट्सचा डाव साधण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच षटकात ओव्हर हॅटट्रिक
वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर स्टार्कनं कॅरेबियन संघातील सलामीवीर जॉन कॅम्पबेल याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तीन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर केव्हलॉन अँडरसन ( Kevlon Anderson) आणि ब्रॅंडन किंग (Brandon King) ची विकेट घेत स्टार्कनं ओव्हर हॅटट्रिकचा डाव साधला.
दुसरे षटक निर्धाव टाकल्यावर तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारला 'पंजा'
पहिल्या षटकानंतर वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद ० अशी झाली होती. हेजलवूडनं दुसरं षटक टाकल्यावर तिसऱ्या षटकात पुन्हा स्टार्क गोलंदाजीला आला. हे षटक त्याने निर्धाव टाकले. त्यानंतर वैयक्तिक तिसऱ्या आणि वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने मिकाइल लुईस (Mikyle Louis) याची विकेट घेतली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर २ धावा दिल्यावर तिसऱ्या चेंडूवर शाई होपला पायचित करत स्टार्कनं पंजा मारला. पहिल्या १५ चेंडूत २ धावा खर्च करत स्टार्कनं ५ विकेट्सचा डाव साधला.
तिघांना मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
याआधी सर्वात कमी चेंडूत ५ विकेट्सचा डाव साधण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन दिग्गज अर्नेस्ट तोशॅक याच्या नावे होता. या गोलंदाजाने १९४७ मध्ये भारतीय संघाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी सामन्यात १९ चेंडूत फाइव्ह विकेट्स हॉलचा डाव साधला होता. इंग्लंडच्या स्टुअर्ड ब्रॉडनं २०१५ मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन स्कॉट बोलंड याने मेलबर्न कसोटीत इंग्लंडविरुद्ध १९ चेंडूत हा पराक्रम करून दाखवला होता. स्टार्कनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील खतरनाक स्पेलसह एका दणक्यात तिघांना मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
१०० व्या कसोटीत कसोटीत गाठला ४०० विकेट्सचा टप्पा
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भेदक मारा करताना आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात स्टार्कनं ४०० विकेट्सचा डावही साधला आहे. हा पल्ला गाठणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन गोलंदाज असून तिसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे.