बर्मिंगहॅम : ‘विराट कोहलीने भले शतकी खेळी केली नाही, तरी चालेल, पण त्याच्याकडून संघासाठी विजयी खेळीची अपेक्षा आहे,’ असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. नोव्हेंबर २०१९ पासून कोहलीकडून कोणत्याही प्रकारात शतकी खेळी झालेली नाही.
द्रविड यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडू विविध काळातून सामोरा जातो आणि मला नाही वाटत कोहलीला कोणती प्रेरणा मिळवून देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनाच त्याची क्षमता माहीत आहे.’
द्रविड पुढे म्हणाले की, ‘दरवेळी शतकी खेळीवर जोर देणे योग्य नाही. केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत कोहलीने केलेली ७९ धावांची खेळीही खूप महत्त्वाची ठरली होती. तो शतकापासून वंचित राहिला, पण ती खेळा जबरदस्त होती. कोहलीने आपला एक वेगळा उच्च दर्जा तयार केला असून, लोकांना कायम त्याच्याकडून शतकाची अपेक्षा असते. पण एक प्रशिक्षक म्हणून मी त्याच्याकडून विजयी खेळीची आशा करतो. मग भले त्याने ५०-६० धावा केल्या तरी चालेल.’