मुंबई - न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले होते. मात्र असे असले तरी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र अंतिम लढतीमधील कामगिरीवरून भारतीय संघातील खेळाडूंवर नाराज आहे. अंतिम सामन्यात अपेक्षित निकाल लागला असला तरी या लढतीमध्ये भारतीय खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ खेळला नसल्याचे राहुल द्रविडने म्हटले आहे.
विश्वचषक जिंकून मायदेशी परतल्यावर आज भारतीय युवा संघाचे मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कर्णधार पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी द्रविड म्हणाला, "मला या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे. त्यांनी विश्वविजेतेपद मिळवलं आहे. पण या संघाने अंतिम लढतीत आपला सर्वोत्तम खेळ केला, असं मला वाटत नाही. पण सरतेशेवटी आम्हाला अपेक्षित असलेला निकाल लागला."
यावेळी विश्वविजेतेपद मिळवण्यापेक्षा संघाच्या जडणघडणीची प्रक्रिया आपल्यासाठी समाधानकारक असल्याचे द्रविड म्हणाला, संघबांघणीची प्रक्रिया सुमारे 15 ते 16 महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. त्यामध्ये खेळाडूंना हेरून त्यांना विकसित करणे आणि त्यांच्यासाठी योजना आखणे यांचा समावेश होता. आता ही प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे, असेही
राहुल द्रविडने सांगितले.
यावेळी भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने भारतासाठी विश्वचषक जिंकणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.