Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी: "टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला?

Wasim Jaffer Team India, Champions Trophy 2025: दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या भारतीय संघाला जाफरने असा सल्ला का दिला, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:57 IST

Open in App

Wasim Jaffer Team India, Champions Trophy 2025: सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात सुरू आहे. आठ पैकी सात संघ पाकिस्तानात त्यांचे सामने खेळत आहेत, परंतु भारतीय संघाची सुरक्षितता लक्षात घेता टीम इंडिया दुबईत आपले सर्व सामने खेळत आहे. भारताच्या गटात असणारे संघ भारताशी सामना खेळण्यासाठी दुबईला प्रवास करत आहेत आणि भारत एकाच मैदानावर आपले सर्व सामने खेळत आहे, ही गोष्ट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू कर्णधार नासिर हुसेन याला भलतीच खटकली. एकाच मैदानावर सर्व सामने खेळण्याचा भारतीय संघाला जास्तीचा फायदा मिळतोय, असे मत त्याने व्यक्त केले. यावर भारतीय माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याने त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले.

नासिर हुसेन काय म्हणाला होता?

"भारतीय संघ त्यांचे सर्व सामने एकाच मैदानावर खेळत आहे. त्यांना कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही. एका ठराविक कारणामुळे भारतीय संघाला हे सामने दुबईत खेळायला परवानगी देण्यात आली आहे, पण याचा त्यांना जादाचा फायदा मिळत आहे. इतर संघांप्रमाणे त्यांना प्रवास करावा लागत नाही आणि पीच पाहून प्लेइंग इलेव्हन बदलावी लागत नाही", अशी खदखद नासिर हुसेनने व्यक्त केली होती.

वासिम जाफरचे चोख प्रत्युत्तर

नासिर हुसेनच्या या आरोपाला उत्तर देताना वासिम जाफरने त्याला चांगलेच धारेवर धरले. तो म्हणाला, "भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी भारत सरकारने नाकारली आहे. राजकीय आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रत्येक संघाला हा अधिकार असतो. त्यामुळे या गोष्टींवर बोलण्यात अर्थ नाही. तरीही मला असे वाटते की टीकाकारांना बरे वाटावे म्हणून टीम इंडियाने एका हॉटेल मधून दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावे. जेणेकरून या लोकांना शांतता मिळेल."

२०२३ वर्ल्डकपची करून दिली आठवण

वासिम जाफरने २०२३च्या विश्वचषकाबाबतही नासिर हुसेनला आठवण करून दिली. "भारतात झालेल्या वनडे विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघ हा एकमेव असा संघ होता ज्याने नऊ सामने वेगवेगळ्या मैदानावर खेळले होते. यादरम्यान भारतीय संघाने एकापाठोपाठ एक कुठलेही सामने समान मैदानावर खेळले नाहीत. भारतीय संघाने सुमारे १२ हजार मैलांपेक्षा जास्तीचा प्रवास केला होता. तसेच दोन सामन्यांमधील अंतर कधीही चार दिवसांपेक्षा जास्त नव्हते. त्यावेळी भारतीय संघाने कुठलीही तक्रार केली नव्हती, परंतु आत्ताची परिस्थिती वेगळी आहे हे इतरांनी समजून घ्यायला हवे," असे जाफर म्हणाला.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघइंग्लंडवासिम जाफर