सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वर्षासाठी निलंबित करण्यता आलेल्या आॅस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर एका क्लबकडून खेळताना दिवंगत खेळाडू फिलिप ह्यूज याच्या भावाने अपमानास्पद टीका केली. यामुळे नाराज होत वॉर्नरने मैदान सोडले होते. या घटनेची माहिती वॉर्नरची पत्नी केंडीसने दिली. मात्र, संघसहकाऱ्यानी समजूत काढल्यानंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या वॉर्नरने १५७ धावांची तुफानी खेळी केली.
फिलिप ह्यूजचा २०१४ मध्ये डोक्याला चेंडू लागून अपघाती मृत्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्षभरासाठी निलंबित झालेला वॉर्नर रेंडविक - पिटरशॅम या क्लबकडून खेळत आहे. तो फलंदाजी करत असताना फिलिपच्या भावाने त्याच्यावर अपमानास्पद टीका केली. यावेळी वॉर्नर ३५ धावांवर खेळत होता. नाराज होऊन वॉर्नरने मैदान सोडले. वॉर्नरच्या पत्नीने या घटनेसाठी ह्यूज याला जबाबदार धरले आहे. मात्र अन्य खेळाडूंनी वॉर्नरची समजूत काढल्यानंतर वॉर्नर परत मैदानात आला व त्याने १५७ धावांची आकर्षक खेळी केली.