दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या चार दशकांच्या इतिहासात जे पहिल्यांदा घडले नाही, ते आता काही तासांनंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. सप्टेंबर महिन्यातील हा सलग तिसरा रविवार या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील द्वंदाने पुन्हा गाजणार. मैदानावर युद्ध नक्कीच रंगेल, पण अमेरिकन लेखक माईक मार्कुसी यांच्या शब्दांत, हे शस्त्रांविना खेळले जाणारे युद्ध असेल. त्यामुुळे 'शस्त्रसंधी'च्या फंदात न पडता दोन्ही संघ सुरुवातीपासून त्वेषाने खेळताना दिसतील.
भारतीय संघ सलामीवीर अभिषेक शर्मावरच जास्त विसंबून आहे असे बोलले गेले. पण, शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माने हा समज खोटा ठरवला. दुसरीकडे, पाकिस्तानच्या कमतरता अधिक उघड झाल्या. त्यांच्या फलंदाजांना विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. साहिबजादा फरहानव्यतिरिक्त इतर फलंदाज फुसके ठरले आहेत.
दोन्ही संघांची तुलना
> या स्पर्धेत भारत आतापर्यंत अजिंक्य आहे. पाकिस्तान मात्र फायनलपर्यंत रडतखडत पोहोचला.
> पाकिस्तानकडे कोणताही खंदा फलंदाज नाही. गोलंदाज शाहिन आफ्रिदीने त्यांना अनेकदा सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
> भारताकडे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीसारखे शानदार फिरकी गोलंदाज आहेत. हे गोलंदाज पाकिस्तानच्या अबरार आणि नवाजवर भारी पडू शकतात.
भावनांचा कल्लोळ एकसारखा
या फायनलची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. इथे तणाव आहे, उत्तेजक हावभाव आहेत आणि दोन्ही बाजूंवर लावलेले दंडही आहेत. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘फायनल हा एकमेव सामना आहे, जो महत्त्वाचा आहे.’ तर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल म्हणतात, विजयी होणे हेच अंतिम ध्येय असायला हवे.
आयसीसी विश्वचषक : भारताने आतापर्यंत पाकिस्तानवर १६ सामन्यांपैकी भारताने १५ मध्ये विजय मिळवला आहे.
वनडे विश्वचषक : ८-०, तर टी-२० विश्वचषकात ७-१ असा विजयी रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे.
१९८४ पासून सुरू झालेली आशिया चषक स्पर्धेत २०२३ पर्यंत, ८ विजेतेपदांसह भारत सर्वांत पुढे आहे. भारताने या स्पर्धेचे विजेतेपद १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ साली पटकावलेले आहे. दुसरीकडे आशिया चषकाची दोन विजेतेपदे पाकिस्तानच्या नावावर आहेत. त्यांनी २००० आणि २०१२ हा चषक जिंकला. श्रीलंकेचा संघ ६ विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे.