Join us  

विराट कोहलीचा अजून एक पराक्रम, आयसीसी क्रमवारीत केली सचिनशी बरोबरी

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. या शतकाबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर विराटने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 6:42 PM

Open in App

दुबई, दि. 4 -  श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. या शतकाबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्येही सचिनच्या सर्वाधिक गुण मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. तर मालिकावीराचा मान पटकावणाऱ्या जसप्रीत बुमराने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत 27 स्थानांची गरुडझेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका आटोपल्यानंतर आज आयसीसीची फलंदाजी, गोलंदाजी आणि सांघिक क्रमवारी जाहीर झाली. त्यामध्ये फलंदाजीमध्ये विराट कोहलीने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. तसेच या मालिकेत विराटने एक अर्धशतक आणि दोन शतके फटकावली. त्याच्या जोरावर त्याने एकदिवसीय क्रमवारीतील आपली गुणसंख्या 887 पर्यंत वाढवली आहे. त्याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रमरावीत सर्वाधिक गुण मिळवण्याच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सचिनने 1998 साली एकदिवसीय क्रमवारीतील आपली सर्वोत्तम गुणसंख्या नोंदवताना 887 गुणांपर्यंत मजल मारली होती. दरम्यान आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराटपाठोपाठ डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन शतके फटकावणारा रोहित शर्मा आणि  महेंद्रसिंग धोनीनेही आपल्या क्रमवारीत सुधारणा करत अनुक्रमे नववे आणि दहावे स्थान पटकावले आहे.   गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराने मोठी मजल मारत चौथे स्थान पटकावले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या बुमराने पाच सामन्यात मिळून 15 बळी टिपले होते. जोश हेझलवूड, इम्रान ताहीर आणि मिचेल स्टार्क गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. श्रीलंकेविरुद्ध चार सामन्यात सहा बळी टिपणाऱ्या अक्षर पटेललासुद्धा क्रमवारीत मोठा फायदा झाला असून, तो दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सांघिक क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारताकडून व्हाइटवॉश पत्करावा लागल्याने 2019 च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याच्या श्रीलंकेच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.  काल झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने  लंकेचा सहा गडी राखून पराभव केला. लंकादहन केलं आहे. या विजयासह भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघाने सामन्यात लंकेला कुठेही वरचढ होऊ दिले नाही. भारताचा श्रीलंकेविरोधात हा दुसरा व्हाईटवॉश असेल. यापूर्वी भारताने 2014 च्या मालिकेतदेखील श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता. विराट कोहलीने आज 30 शतके ठोकली आहेत. त्यातील आठ शतके ही श्रीलंकेविरोधात आहेत. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघक्रिकेटभारत