टीम इंडिया आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचं विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधार पदावर कायम राहणार नाही. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकून विराट आयसीसी स्पर्धांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत आहे. १७ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. दरम्यान, पुरुषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम क्षण म्हणून विराट कोहलीच्या ( Virat Kohli) २०१६च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीची निवड झाली आहे. ( most stunning moment in ICC Men's T20 World Cup history)
मागील काही दिवसांपासून आयसीसीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम क्षण यासाठी मतदान सुरू केले होते. त्यात अंतिम टप्प्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटची २०१६च्या फायनलमधील फटकेबाजी विरुद्ध विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी असा सामना होता. त्यात विराटनं बाजी मारली. विराटनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५१ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. कोहलीच्या या खेळीला ६८ टक्के मतं पडली.
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी १६१ धावा करायच्या होत्या. त्या सामन्यात विराटनं ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताला २१ चेंडूंत ४५ धावांची गरज होती. कोहलीनं जेम्स फॉल्कनरच्या एका षटकात १९ धावा कुटल्या. विराटच्या फटकेबाजीनं भारतानं सहा विकेट्स व पाच चेंडू राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली होती.