Join us  

सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर

टॉपर कोहलीमध्ये तब्बल शंभरहून अधिक मिलियन यूएस डॉलरचा फरक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 4:51 AM

Open in App

मुंबई : क्रिकेटविश्वात सातत्याने विक्रमी कामगिरी करणाऱ्या ‘किंग कोहली’ याने देशातील सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्येही आपणच ‘किंग’ असल्याचे सिद्ध करताना सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू सेलिब्रिटीचा मान मिळवला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मागोमाग दुसऱ्या स्थानी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार असून त्याच्यामध्ये आणि टॉपर कोहलीमध्ये तब्बल शंभरहून अधिक मिलियन यूएस डॉलरचा फरक आहे.

यावरूनच विराट कोहलीचा सध्याचा दबदबा लक्षात येतो. २०१९ सालच्या तुलनेत कोहलीची ब्रँड व्हॅल्यू ३९ टक्क्यांनी वाढली असून त्याची ब्रँड व्हॅल्यू वर्षाला २३७.५ मिलियन डॉलर (सुमारे १,६९१ कोटी रुपये ) इतकी झाली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (२३ मिलियन डॉलर) तुलनेत दहापट अधिक कोहलीची ब्रँड व्हॅल्यू आहे.

कोहलीची ब्रँड व्हॅल्यू अक्षय कुमार, शाहरुख खान आणि रणवीर सिंग-दीपिका पदुकोन यांच्यापेक्षा अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरील अक्षयची ब्रँड व्हॅल्यू यंदा १०४.५ मिलियन झाली आहे. दीपिका-रणवीर ही जोडी (९३.५ मिलियन) तिसऱ्या, तर शाहरुख खान चौथ्या स्थानी असल्याचे अमेरिकेच्या ग्लोबल सल्लागार कंपनी डफ अँड फेल्प्सच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

टॉप२० मध्ये चार क्रिकेटपटू

२०१९ वर्ष कोहलीने गाजवले. आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील अपयशानंतर कोहलीने आतापर्यंत भारतासाठी सलग ११ मालिका जिंकल्या आहेत. ब्रँड व्हॅल्यूच्या अव्वल २० क्रमांकात चार क्रिकेटपटू आहेत. धोनी (४१.२ मिलियन) दुसºया स्थानी आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर (२५.१ मिलियन) व रोहित शर्मा (२३ मिलियन) यांचा क्रमांक आहे.

अचाट कामगिरीचा असा होतो फायदा

जगभरात मोठा चाहता वर्ग असलेल्या कोहलीची प्रत्येक खेळी विक्रमाला गवसणी घालणारी असते. त्याच्या खेळातील सातत्य भल्याभल्यांना अचंबित करणारे आहे. मैदानावरील या अचाट कामगिरीचा फायदा त्याला ब्रँड व्हॅल्यू उंचावण्यासाठी होतो.

टॅग्स :विराट कोहलीदीपिका पादुकोणरणवीर सिंगभारत