मुंबई : विराट कोहलीने 2018 मध्ये धावांची आतषबाजी करताना विक्रमांचा पाऊस पाडला. त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) 2018 चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. याशिवाय वन डे व कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही त्याने पटकावला. सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार कोहलीने प्रथमच जिंकला आहे, तर त्याने सलग दुसऱ्यांदा वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. कोहलीने गतवर्षी सर गार्फिल्ड ट्रॉफी आणि वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. कोहलीने या कामगिरीबरोबर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना न जमलेली गोष्ट करून दाखवली.
2018 वर्षात कोहलीने 13 कसोटी सामन्यांत 55.08च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत आणि त्यात पाच शतकांचा समावेश आहे. 14 वन डे सामन्यांत त्याने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा चोपून काढल्या. वन डेत त्याने मागील वर्षात सहा शतकं ठोकली, तर 10 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने 211 धावा केल्या. त्याने 2018 मध्ये 37 सामन्यांत 47 डावांमध्ये 68.37च्या सरासरीने एकूण 2735 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2012 मध्ये वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आहे.
आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारा कोहली हा चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी राहुल द्रविड ( 2004), सचिन तेंडुलकर ( 2010) आणि आर अश्विन ( 2016) यांनी हा मान पटकावला. हा मान दोन वेळा जिंकण्याचा पराक्रम त्यांना करता आला नाही आणि तो कोहलीने करून दाखवला. कोहलीने 2017 मध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला होता.