न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी अनेक स्टार क्रिकेटर पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात खेळताना दिसणार आहेत. पण किंग कोहलीचा जलवा मात्र दिसणार नाही. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात कोहलीमुळे देशांतर्गत स्पर्धेत एक वेगळा माहोल निर्माण झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी आणखी एका सामन्यासाठी मैदानात उतरेल, अशी चर्चा होती. पण तो आता दिल्लीच्या संघाकडून न खेळता थेट टीम इंडियाकडूच मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण आणि टीम इंडियाच्या प्रिन्स शुभमन गिलसह कुणावर असतील सर्वांच्या नजरा यासंदर्भातील सविस्तर बातमी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यर मैदानात उतरणार
सोमवारी श्रेयस अय्यरची विजय हजारे ट्रॉफीतील उर्वरित सामन्यांसाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या संघाकडून श्रेयस अय्यर मैदानात उतरणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यापासून तो टीम इंडिया बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करून तो टीम इंडियातील आपले प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आधी श्रेयस अय्यरला कॅप्टन्सीची लॉटरी; खांद्यावर मुंबई संघाची जबाबदारी
सामन्यापूर्वी शुभमन गिलचा सराव
भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलनेही मंगळवारी के. एल. सैनी स्टेडियमवर गोव्याविरुद्ध होणाऱ्या पंजाबच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यापूर्वी सराव केला. फूड पॉइझनिंगमुळे तो शनिवारी सिक्कीमविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी तो गोवा संघाविरुद्ध खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे.
विराट कोहली टीम इंडियाच्या शिबीरात होणार सामील
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत दमदार फलंदाजी केली. दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात अलूरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात तो यंदाच्या हंगामातील तिसरा सामना खेळेल, अशी अपेक्षा होती. पण तो दिल्लीच्या संघाकडून न खेळता थेट टीम इंडियाच्या शिबीरात सामील होणार आहे. विराटने जे दोन सामने खेळले त्यात आंध्रप्रदेशविरुद्ध त्याने १३१ धावा, तर गुजरातविरुद्ध ७७ धावांची खेळी केली होती. तो ११ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.