लाहोर : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वकार युनूस याने किंग कोहलीबाबत आश्चर्यचकित विधान केले आहे. विराटने नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमधील ४७ वे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ७७ वे शतक झळकावले. आशिया चषकात सुपर-फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची नाबाद खेळी खेळल्यानंतर कोहलीने सर्वांत जलद १३ हजार वनडे धावांचा पराक्रमही केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. कोहलीने २६७ डावांत तर सचिनने ३२१ डावांत हा आकडा गाठला आहे. यावर वकार युनूसने किंग कोहलीबाबत अजब भाकीत वर्तविले आहे. ३४ वर्षीय कोहली आता सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. सचिनने वनडेत ४९ शतके झळकावली आहेत. या पार्श्वभूमीवर वकार युनूस म्हणाला, ‘जेव्हा कोहलीची कारकीर्द संपेल, तेव्हा त्याच्या खात्यात इतकी शतके असतील ज्याचा लोकांना अंदाजही नसेल. युनूसने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, सचिनने वन डे कारकिर्द पूर्ण केली तेव्हा त्याच्या नावावर ४९ शतके होती.’