मॉडर्न क्रिकेटमधील फिट अँण्ड हिट फलंदाज विराट कोहली याने १४ वर्षांच्या प्रवासानंतर कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी त्याने रेड बॉल क्रिकेटला अलविदा करत फक्त वनडेवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याच्यासंदर्भात खास प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर करत विराट कोहलीचा कसोटी कारकिर्दीतील प्रवास अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. कोहली हा सचिनचा वारसा जपणार क्रिकेटर आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सचिन चांगलाच भावूक झाल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीसाठी क्रिकेटच्या देवाची भावूक पोस्ट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक भावनिक पोस्ट शेअर करत कोहलीला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीसाठी क्रिकेटच्या देवाने शेअर केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. जाणून घेऊयात सचिन तेंडुलकर आपला वारसा जपणाऱ्या विराट कोहलीसंदर्भात नेमकं काय म्हटलं आहे त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी
विराट-सचिन यांच्यातील 'धागा' अन् १२ वर्षांपूर्वीचा किस्सा
"तू कसोटीतून निवृत्त होत असताना १२ वर्षांपूर्वीचा माझ्या शेवटच्या कसोटी सामन्या दरम्यान तू केलेल्या विचारशील कृतीची आठवण झाली. तू तुझ्या दिवंगत वडिलांकडून मिळालेला एक धागा मला गिफ्टच्या रुपात देण्याची इच्छा व्यक्त केली होतीस. ते स्विकारणे माझ्यासाठी खूप वैयक्तिक गोष्ट होती. ती हृदयस्पर्शी कृती आजही माझ्यासोबत आहे. त्या बदल्यात देण्यासाठी माझ्याकडे धागा नव्हता. पण एक गोष्ट लक्षात ठेव की, माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्यासोबत आहेत. विराट, तुझा प्रवास पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धावांशिवाय तू खूप काही दिले आहेस." असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.