भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी करत आपले ५२ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे एकूण ८३ वे शतक ठरले. कोहलीने १२० चेंडूंत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३५ धावांची धडाकेबाज खेळी केली. कोहलीच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे? हे स्पष्ट केले आहे.
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यापैकी एकाची निवड करताना, सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज मानले आहे. जिओहॉटस्टारवर बोलताना गावस्कर म्हणाले की, "जेव्हा तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूला मागे टाकता, तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही कुठे उभे आहात. विराट कोहलीसोबत आणि त्याच्याविरुद्ध खेळलेले सर्वजण सहमत आहेत की, तो एकदिवसीय फॉरमेटमधील महान फलंदाज आहे."
कोहलीने सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडित काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ४९ आणि विराट कोहलीने ५२ शतक झळकावली आहेत. कोहलीच्या या कामगिरीमुळे आणि गावस्कर यांच्या प्रशंसामुळे, क्रिकेट विश्वात त्याला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्थान मिळत असल्याचे चित्र आहे.