Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने काल(12 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पत्नी अनुष्का शर्मासोबत कृष्णानगरी वृंदावनमध्ये पोहोचला. यावेळी त्याने येथील प्रसिद्ध कुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. दोघेही आश्रमात 2 तास राहिले, यादरम्यान प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे खाजगी चर्चाही केली.
तिसऱ्यांदा वृंदावनात पोहोचलेविराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची संत प्रेमानंद महाराजांवर गाढ श्रद्धा आहे. कोहली आणि अनुष्का यांची प्रेमानंद महाराजांना भेटण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, दोघांनी 2023 मध्ये आणि या वर्षी जानेवारीमध्येही वृंदावनला भेट दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आज विराट कोहलीने प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे संवाद साधला आणि उर्वरित वेळेत त्यांनी आश्रमातील कामकाजाची पाहणी केली.
विराट कसोटीतून निवृत्तविराट कोहलीने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहलीची एकूण 14 वर्षांची कसोटी कारकीर्द होती, ज्यामध्ये त्याने 123 कसोटी सामन्यांच्या 210 डावांमध्ये 30 शतकांसह 9230 धावा केल्या आहेत. कोहलीने शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला. यादरम्यान त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच पर्थ कसोटीत शतक झळकावले.