Virat Kohli Injury Update, Ind vs Eng 2nd ODI : भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल याने ८७, श्रेयस अय्यरने ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. या सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता. दुखापतीचे कारण पुढे करत त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता दुसऱ्या वनडेमध्ये तो खेळणार की नाही, याबाबत महत्त्वाचे अपडेट आले आहे.
काय म्हणाले बॅटिंग कोच?
भारताचा रनमशिन विराट कोहली याला पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला संघात समाविष्ट केले नव्हते असे टॉसच्या वेळी रोहित शर्माने सांगितले होते. त्यानंतर आता कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी विराट खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. याचदरम्यान भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी कोहलीबाबत महत्त्वाची अपडेट दिली. "विराट कोहली हा एकदम तंदुरुस्त आहे. तो सामना खेळण्यासाठी फिट आहे. तो आज नेट प्रॅक्टिससाठी आला होता आणि तो फलंदाजी करताना चांगल्या लयीतदेखील दिसला."
प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का?
पत्रकारांशी संवाद साधताना विराट फिट असल्याचे सांगणाऱ्या सितांशु कोटक यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. विराट कोहली दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग ११ मध्ये असणार की नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, विराटला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान द्यायचे की नाही याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर घेतील.
विराटसाठी कुणाचा बळी जाणार?
विराटला संघात घेतल्यावर प्लेइंग इलेव्हनमधून कुणाला बाहेर काढायचं? हा मोठा प्रश्न कॅप्टन, कोच आणि संघ व्यवस्थापनासमोर असेल. जर विराट संघात आला तर देशांतर्गत क्रिकेटमधून एकाच संघातून खेळणाऱ्या दोन मुंबईकरांपैकी एकाचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित आहे. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला संधी मिळाली. त्याने दमदार अर्धशतक ठोकत आपली उपयुक्तता सिद्ध केली. तर दुसरीकडे यशस्वी जैस्वालला वनडे पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. २२ चेंडूत १५ धावांची खेळी करून तो बाद झाला. अशा परिस्थितीत यशस्वीला आणखी एक संधी दिली जाणार की श्रेयसची अर्धशतकी खेळी त्याची जागा वाचवणार, यावर साऱ्यांचेच लक्ष आहे.