Virat Kohli Injured, IND vs NZ Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवार ९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण याआधीच भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल ही चिंतेची बाब आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान कोहलीला दुखापत झाल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. कोहलीला फलंदाजी करताना ही दुखापत झाली. त्यानंतर त्याने सराव थांबवला आणि वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली.
चेंडू गुडघ्याला लागून झाली दुखापत
सराव करताना विराट वेगवान गोलंदाजांचा सामना करत होता. आयसीसी अकादमीमधील सराव सत्रादरम्यान एक चेंडू त्याच्या गुडघ्याला लागला. यानंतर त्याने फलंदाजी करणे थांबवले आणि भारतीय संघाचे फिजिओ त्याच्या दुखापतीबाबत माहिती घेत असून प्राथमिक उपचार करत आहेत. दरम्यान, चेंडू गुडघ्याला लागल्यानंतर कोहलीने सराव केला नाही, पण तो इतर खेळाडूंच्या सरावावर लक्ष ठेवून होता आणि संघासोबत मैदानावरच थांबला, असे पाकिस्तानी माध्यमांमधील एका वृत्तानुसार सांगण्यात आले आहे.
कोहली अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त
अलिकडच्या काळात विराटची तंदुरुस्ती देखील टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनली आहे आणि अलिकडेच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही खेळू शकलेला नव्हता. अशा परिस्थितीत, ही नवी दुखापत विराटसाठी त्रासदायक ठरू शकते. पण दिलासा देणारी बाब म्हणजे कोहलीची दुखापत फारशी गंभीर नाही. या अहवालात भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा हवाला देत असे म्हटले आहे की कोहली अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त आहे आणि तो मैदानात नक्की उतरेल.
भारतासाठी सर्वाधिक धावा
जर टीम इंडियाला जेतेपद जिंकायचे असेल तर विराट कोहली तंदुरुस्त होऊन मैदानात उतरणे खूप महत्वाचे आहे. या स्पर्धेत आतापर्यंत विराटने दोन मॅच विनिंग इनिंग खेळल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने १०० धावांची नाबाद खेळी केली होती. तर उपांत्य फेरीतही कोहलीने ८४ धावांची अप्रतिम खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. कोहलीने आतापर्यंत स्पर्धेतील ४ डावांमध्ये २१७ धावा केल्या आहेत.