मुंबई - टी-20 मालिकेतील यशानंतर भारतीय क्रिकेट संघाने आपला मोर्चा गुरूवारपासून सुरू होत असलेल्या वन डे मालिकेकडे वळवला आहे. भारत आणि यजमान इंग्लड यांच्यातील वन डे मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅम येथे गुरूवारी खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत विजय मिळवून आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर करण्याची संधी भारतीय संघाला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ वन डे क्रमावारीत 122 गुणांसह दुस-या स्थानावर आहे आणि इंग्लंड 126 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकल्यास भारताला क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे. मात्र, इंग्लंडने त्याच फरकाने मालिका विजय मिळवल्यास ते 10 गुणांच्या फरकाने आघाडीवर राहणार आहेत.
वन डे फलंदांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली 909 गुणांसह आघाडीवर आहे. टी-20 मालिकेत खणखणीत शतक झळकावणा-या रोहित शर्माने वन डेतही सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास त्यालाही क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. तो 799 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.