Join us

Ruturaj Gaikwad : नाद करायचा नाय...; ऋतुराज गायकवाडनं एकट्यानं मॅच फिरवली, १८ चेंडूंत ८० धावांची आतषबाजी केली

चेन्नई सुपर किंग्सनं रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी) या चार खेळाडूंना आयपीएल २०२२साठी संघात कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:35 IST

Open in App

Vijay Hazare Trophy, Ruturaj Gaikwad century : चेन्नई सुपर किंग्सनंच आयपीएल २०२२ साठी संघात कायम राखून दाखवलेला विश्वास ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) सार्थ ठरवला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी  स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफी वन डे स्पर्धेत महाराष्ट्राला एकहाती विजय मिळवून दिला. मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत ऋतुराजनं शतकी खळी करताना १८ चेंडूंत ८० धावा कुटल्या. महाराष्ट्रानं हा सामना ५ विकेट्स व २ चेंडू राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेशनं  ६ बाद ३२८ धावा चोपल्या. शुभम शर्मानं १०२ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह १०८, कर्णधार आदित्य श्रीवास्तवनं ८२ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १०४ आणि अभिषेक भंडारीनं ७० धावांची खेळी करताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांना हैराण केले. मुकेश चौधरी ( २-५४) व आषय पालकर ( २-८६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मनोज इंगळेनं ७७ धावांत १ बळी टिपला. आझीम काझी ( १० षटकांत ४७ धावा) व  राहुल त्रिपाठी ( ३ षटकांत ११ धावा) यांनी चांगली गोलंदाजी केली. 

प्रत्युत्तरात कर्णधार ऋतुराज व यश नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यश ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर नौशाद शेख ( ३४), राहुल त्रिपाठी ( ५६) यांनी ऋतुराजला चांगली साथ दिली. संघाला विजयासाठी ६० धावांची गरज असताना ऋतुराज बाद झाला. त्यानं ११२ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १३६ धावा केल्या. अंकित बावणे ( २४*) व  स्वप्निल फुलपागर ( २२*) यांनी दमदार खेळ करताना महाराष्ट्राचा विजय पक्का केला. महाराष्ट्रानं ४९.४ षटकांत ५ बाद ३३० धावा करून विजय मिळवला. 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडमहाराष्ट्रमध्य प्रदेशविजय हजारे करंडक
Open in App