चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेआधी हार्दिक पांड्या वनडे सामना खेळण्यासाठी तयार झाला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो बडोदा संघाकडून मैदानात उतरणार आहे. वैयक्तिक कारणास्तवर देशांतर्गत वनडे स्पर्धेतील पहिल्या काही सामन्यासाठी तो संघाला जॉईन झाला नव्हता. पण आता तो पुन्हा एकदा वनडे मॅच खळण्यासाठी तयार आहे.
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता अखेरचा सामना
हार्दिक पांड्याने अखेरचा वनडे सामना १९ ऑक्टोबर २०२३ रोजी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळला होता. दुखापतीमुळे त्याच्यावर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली होती. मिनी वर्ल्ड कप अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टिने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वनडे खेळण्याचा निर्णय हार्दिक पांड्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
भाऊ क्रुणालच्या नेतृत्वाखाली वर्षभरानंतर वनडे मॅच खेळणार पांड्या
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पांड्या बाद फेरीतील सामन्यात खेळताना दिसेल, अशी बातमी चर्चेत होती. पण आता चौथ्या फेरीतील बंगालविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २८ डिसेंबरला बडोदा आणि बंगाल यांच्यातील लढत रंगणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भाऊ क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. वर्षभरानंतर वनडे मॅच खेळताना ३१ वर्षीय पांड्या कशी छाप सोडणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.
याआधी देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्येही दिसली होती पांड्याची झलक
हार्दिक पांड्या वनडेपासून दूर असला तरी टीम इंडियाकडून तो टी-२० क्रिकेटच्या मैदानात सातत्याने खेळताना दिसला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही तो सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो बडोदा संघाकडून मैदानात उतरला होता. देशांतर्गत स्पर्धेत बॅटिंग बॉलिंगमध्ये धमक दाखवत त्याने संघाला सेमी फायनलपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिकाही बजावली होती. या स्पर्धेतील ७ सामन्यात त्याने २४६ धावा केल्या होत्या. याशिवाय ६ विकेट्सही त्याने घेतल्याचे पाहायला मिळाले होते. BCCI नं ऑफ सीझनमध्ये भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत. या नियमाचे हार्दिक पांड्या पालन करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत छाप सोडून तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियातील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Web Title: Vijay Hazare Trophy Hardik Pandya Return Baroda ODI After World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.