नवी दिल्ली - आशिया कप २०२५ च्या मालिकेत पाकिस्तानी टीमला भारतीय टीमने ३ वेळा मात दिली होती. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर पाकच्या खेळाडूंची बोलतीच बंद झाली. भारताकडून हरल्याने पाकिस्तानी टीमला त्यांच्या देशातच टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र पाकिस्तानी खेळाडूंची अरेरावी अजूनही तशीच आहे. पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदचं भारतीय खेळाडूबद्दल एक विधान समोर आलं आहे त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे.
अबरार अहमदच्या विधानावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. अबरार अहमदला भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनसोबत बॉक्सिंग खेळायची आहे. हे विधान त्याने एका मुलाखतीत म्हटलं. असा कुठला क्रिकेटर आहे ज्याच्यासोबत तुला बॉक्सिंग करायची आहे असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अबरारने शिखर धवनचं नाव घेतले. त्यानंतर सोशल मीडियात अबरार अहमद पुन्हा ट्रोल झाला आहे.
शिखर धवनसोबत करायची आहे बॉक्सिंग
अबरार अहमदनं अलीकडेच आशिया कप आणि यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केले होते. एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला. जगातील असा कुठला खेळाडू आहे, जो तुझ्या समोर असायला हवा, ज्याच्याशी तू बॉक्सिंग करशील, ज्याच्यावर तुला खूप राग येतो असा प्रश्न विचारला गेला. त्यावर मी बॉक्सिंगसाठी उभा राहीन तेव्हा माझ्यासमोर शिखर धवन असायला हवा असं उत्तर त्याने दिले.
शिखर धवननं बऱ्याचदा चर्चेत
माजी क्रिकेटपटू शिखर धवन सध्या बराच चर्चेत आहे. सर्वात आधी त्याचा पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीसोबत शाब्दिक वाद रंगला. त्यानंतर त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. हा सामना पाकिस्तानविरोधात होता. त्यात पाकिस्तानी टीममध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश होता. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला अन् त्यानंतर भारत-पाक यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा दाखला देत भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातवर बहिष्कार टाकला होता. नियोजित सामना रद्द होण्यामागे फक्त एक खेळाडू आहे, असे सांगताना शाहीद आफ्रिदी शिखर धवनचे नाव घेतले.