Join us

Barry McCarthy AUS vs IRE, Video: शानदार.. अद्भूत.. जबरदस्त..!! बॅरी मॅकार्थीची फिल्डिंग पाहून अख्ख्या स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट

सिक्स जातोय पाहताच त्याने झेप घेत हवेतच चेंडू पकडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:43 IST

Open in App

Barry McCarthy brilliant fielding Video, AUS vs IRE: T20 World Cup 2022 स्पर्धेत आतापर्यंत अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत अनेक वेळा खेळाडूंनी आपल्या फिल्डिंगच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव आज जोडले गेले आहे. ते नाव म्हणजे बॅरी मॅकार्थी. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज बॅरी मॅकार्थी याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाब्बा मैदानावरील सामन्यात सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. फिल्डिंग करताना, त्याने आपल्या फिटनेसचा उत्कृष्ट असा पुरावा दिला आणि या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मॅकार्थीने अडवला षटकार!

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने फलंदाजी करताना मार्क एडेअरच्या गोलंदाजीवर लाँग-ऑनच्या दिशेने हवेत फटका मारला. चेंडू बॅटला लागला आणि हवेत उंच गेला, त्या दरम्यान बॅरी मॅकार्थी धावत-धावत चेंडूच्या खाली येऊन पोहोचला. स्टॉयनीसचा फटका पाहून प्रत्येकाला असे वाटत होते की, तो षटकारच जाणार. पण मॅकार्थीने सर्वांना चुकीचे सिद्ध केले. आयर्लंडच्या मॅकार्थीने सीमारेषेच्या अगदी जवळ असताना हवेत झेप घेतली. त्याने हवेतच चेंडू पकडला आणि तो मैदानाच्या आतल्या बाजूला फेकला. मॅकार्थीचा प्रयत्न पाहून सारेच थक्क झाले. इतकेच नव्हे, तर संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट ऐकायला मिळाला. पाहा Video-

बॅरी मॅकार्थीने केवळ क्षेत्ररक्षण करतानाच नव्हे तर गोलंदाजी करतानाही उत्तम कामगिरी केली. या सामन्यात आयरिश गोलंदाजाने चार षटकांत केवळ २९ धावा देत ३ बळी घेतले. डेव्हिड वॉर्नर, कर्णधार एरॉन फिंच आणि मिचेल मार्श या वरच्या फळीतील तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत मॅकार्थीने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा दाखवून दिली. तसे असले तरीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी योग्य वेळी फटकेबाजी करत २० षटकांत ५ बाद १७९ पर्यंत मजल मारली.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियाआयर्लंडसोशल मीडिया
Open in App