USA Announced Squad For T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेच्या क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचा संघ भारताविरुद्ध वानखेडेच्या मैदानातून ७ फेब्रुवारीला आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. अमेरिकेचा संघ जाहीर करण्यात आल्यावर कॅप्टनचे गुजरात कनेक्शन आणि वर्ल्ड कप संघात पुन्हा एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरची झालेली निवड चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय वंशाच्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळणार अमेरिका
अमेरिकेच्या संघाने टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत सुपर ८ फेरीपर्यंत मजल मारली होती. याच जोरावर त्यांना यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील स्पर्धेसाठी अमेरिकेच्या संघाने भारतीय वंशाच्या गुजरातमध्ये जन्मलेला मोनांक पटेल याच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. या संघात एकूण १० खेळाडू असे आहेत जे मागील विश्वचषकातही संघाचा भाग होते.
उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी
सौरभ नेत्रवालकरही संघात, या नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी अमेरिकन संघात पुन्हा एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअर सौरभ नेत्रवालकर मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. हा खेळाडू मुंबईत जन्मला असून तो IIT बॉम्बेचा पदवीधर आहे. अमिरेकेत स्थायिक झाल्यामुळे तो अमेरिकन क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करतो. गत टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने गोलंदाजीत खास छापही सोडली होती. आता यावेळी जन्मभूमीत चमक दाखवण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. याशिवाय अमेरिकेच्या संघात मोहम्मद मोहसिन आणि शेहान जयसूर्या यांना पहिल्यांदाच विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी अमेरिकेचा संघ
मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्टुश केनजिगे, शॅडली व्हान शाल्कविक, सौरभ नेत्रवालकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजाने.
भारताविरुद्ध पहिला सामना, असे आहे अमेरिकनं संघाचे वेळापत्रक
अमेरिका आपली विश्वचषकातील मोहीम ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या सामन्याने सुरू करणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध त्यांचा दुसरा सामना होणार आहे. पुढे १३ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध तर १५ फेब्रुवारीला नामीबियाविरुद्ध गट टप्प्यातील अखेरचा सामना खेळत अमेरिका आपला प्रारंभिक टप्पा पूर्ण करेल.