ICC U-19 World Cup India vs Australia Semifinal: मध्ये दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारताने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. अद्याप भारतीय संघ सामन्यात एकही सामन्यात पराभूत झालेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला आणि सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानवर ११९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध याच स्पर्धेच्या सराव सामन्यात भारत खेळला होता आणि जिंकलाही होता. त्यानंतर आता आजच्या सामन्यातही भारतीय संघ जिंकावा अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.
सामन्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या डिटेल्स-
कधी - आज (२ फेब्रुवारी)
कुठे - अँटिग्वाच्या कूलिज क्रिकेट मैदानावर
किती वाजता - संध्याकाळी ६.३० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
कुठे बघता येईल - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
ऑनलाईन कुठे - हॉटस्टार अँप वर
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात काय घडलं होतं?
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद २६८ धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार कूपर कोनोली याने एकाकी झुंज देत ११७ धावांची खेळी केली होती. त्यात १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सामना ९ गडी आणि १५ चेंडू राखून जिंकला होता. हरनूर शेखची १०० धावांची खेळी आणि रशीदची ७२ धावांची खेळी याच्या जोरावर भारताने संपूर्ण सामना आपल्या नावे केला होता. सराव सामना असल्याने या दोघांनाही रिटायर्ड हर्ट करण्यात आल्यानंतर यश धूलने दमदार अर्धशतक ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला होता.