Tilak Varma Retired Out Mumbai Indians IPL 2025: लखनौ विरूद्धच्या सामन्यादरम्यान तिलक वर्माला रिटायर्ड आउट करणे योग्य नव्हते. मात्र, हा रणनीतीचा भाग होता, अशी प्रतिक्रिया मुंबई संघाचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी पराभवानंतर दिली. लखनौविरुद्ध मुंबईचा १२ धावांनी पराभव झाल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, 'तिलक परिस्थितीनुरूप आक्रमक फटकेबाजी करीत नव्हता. त्यामुळे त्याला माघारी बोलविण्यात आले. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात. त्याला बाहेर बोलविणे योग्य नव्हते; पण मला तो निर्णय घ्यावा लागला. त्यावेळेचा तो धोरणात्मक निर्णय होता.'
तिलकने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून दोन शतके ठोकली आहेत. तो २३ चेंडूंत २५ धावा काढून खेळत असताना त्याला माघारी बोलवून मिचेल सेंटनर याला पाठविण्यात आले होते. मुंबईचे हे डावपेच अपयशी ठरले. 'माझ्या मते, तिलक सुरुवातीला चांगली फलंदाजी करीत होता. तो वेगवान धावा काढेल, अशी आमची अपेक्षा होती. पण, तो तसे करू शकला नाही.'
हार्दिक काय म्हणाला?
"तिलक वर्मा बराच काळ मैदानावर खेळत होता. त्याने वेगाने धावा करायचा प्रयत्नही केला. पण शेवटच्या टप्प्यात आम्हाला मोठ्या फटक्यांची गरज होती. पण दुर्दैवाने तिलक वर्माला तसे फटके मारता येत नव्हते. कालचा दिवस त्याचा नव्हता. त्यामुळे त्याच्याबद्दल अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला कायमच सामना जिंकायचा असतो त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात," असे उत्तर हार्दिक पांड्याने दिले.