Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीमध्ये ट्वेन्टी-20 सामना होणार की नाही, सौरव गांगुलीचं मोठं विधान

पर्यावरण तज्ज्ञांनी दिल्लीमध्ये सामना खेळवला जाऊ नये, असे पत्र बीसीसीआयला पाठवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 12:43 IST

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दिल्ली येथे पहिला ट्वेन्टी-20 सामना आयोजित करण्यात आला आहे. पण येथील प्रदुषणामुळे हा सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे काही जणांनी केली होती. आता हा सामना दिल्लीला होणार की अन्यत्र हलवणार याबाबतचा निर्णय गांगुलीने घेतला आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी मंगळवारी दिल्लीमध्ये सामना खेळवला जाऊ नये, असे पत्र बीसीसीआयला पाठवले होते. त्यामुळे या सामन्याबाबत संदिग्धता होती. पण आता तर दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात होते.

दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्सचा (AQI) अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता फारच वाईट असल्याचे म्हटले गेले आहे. या हवेमध्ये खेळाडू 3-4 तास खेळू शकणार नाहीत. त्याचबरोबर या वातावरणाचा खेळाडूंच्या आरोग्यावर वाईट परीणाम होईल, असेही म्हटले गेले आहे. त्यामुळे आता हा सामना दिल्लीवरून हलवायचा का, याचा निर्णय बीसीसीआयला लवकरच घ्यावा लागणार होता.

हा सामना दिल्लीत खेळवावा की नाही, याबाबत आता गांगुलीने एक मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीने ही गोष्ट स्पष्ट करताना हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्येच होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना दिल्लीमध्येच खेळवण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त 'जागरण' या संकेतस्थळाने दिले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी भारत -बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबर रोजी आयोजित टी२० सामन्याचे आयोजन करू नये, अशी विनंती करणारे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिले होते. वेगाने वाढणारे प्रदूषण खेळाडू तसेच हजारो प्रेक्षकांसाठी धोकादायक ठरू शकते,असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

दिवाळीतील आतषबाजीमुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात वेगाने वाढ झाली. डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेचे खेळाडू येथे मास्क घालून खेळले होते. त्यातील काही खेळाडू नंतर आजारीही पडले. पर्यावरणाबाबत जागरूकता पसरविणाऱ्या संस्थेच्या ज्योती पांडे आणि रवीना राज यांनी बीसीसीआया पत्रात लिहिले,‘दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे टी२० सामना दिल्लीबाहेर आयोजित करावा, अशी आम्ही नम्र विनंती करीत आहोत.’

दिल्लीतील विषयुक्त हवेत तीन- चार तास खेळणारे खेळाडू आणि त्यांचा खेळ पाहणाऱ्या हजारो प्रेक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तब्बेतीची काळजी घेणाऱ्या हजारो लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी सामना इतरत्र खेळविला जावा, असे दोघींनी म्हटले आहे. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सामन्यावर प्रदूषणाचा परिणाम होणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दिल्ली सरकार हवेतील प्रदूषण दूर करून शुद्ध आणि मोकळी हवा घेता यावी, यासाठी उपाययोजना करीत असल्याची त्यांनी ग्वाही दिली होती.

टॅग्स :सौरभ गांगुलीभारत विरुद्ध बांगलादेशदिल्ली