कराची : ‘दोन्ही संघ आयसीसी कराराला बांधील असल्याने, विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला कुठलाही धोका नाही,’ असे स्पष्ट मत आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी व्यक्त केले. आयसीसी स्पर्धेसाठी सर्वच संघांनी भागीदारीसाठी करारावर स्वाक्षरी केली असून याअंतर्गत सर्वच सामने खेळावे लागतात. असे न केल्यास खेळाच्या नियमानुसार प्रतिस्पर्धी संघाला गुण दिले जातात, असे रिचर्डसन यांनी सांगितले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १६ जून रोजी मँचेस्टर येथे पाकविरुद्धचा विश्वचषक सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे.
भारताने रांची येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्ािहदांच्या सन्मानार्थ ‘आर्मी कॅप’ घातली शिवाय सामना शुल्कही राष्टÑीय सैनिक कल्याण निधीला दान केली. पाकने यावर आक्षेप नोंदवून भारत खेळात राजकारण आणत असल्याचा आरोप केला होता. आयसीसीने मात्र यावर भारतीय बोर्डाकडून आधीच परवानगी घेण्यात आली आल्याचे स्पष्ट केले. रिचर्डसन म्हणाले, ‘आर्मी कॅप प्रकरणात पूर्वपरवानगी देण्यात आली होती. जवानांच्या कुटंबीयांसाठी निधी गोळा करण्याचा हेतू होता.’ (वृत्तसंस्था)