Join us

Suryakumar Yadav: "जगात फक्त एकच मिस्टर 360 आहे", SKYचे कौतुक करताना एबी डिव्हिलियर्सने जिंकली मनं

विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताचा सूर्यकुमार यादव शानदार फॉर्ममध्ये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:49 IST

Open in App

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय स्टार फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सूर्याच्या बॅटमधून 225 धावा आल्या आहेत. रविवारी झालेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने 244 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. अनेकवेळा त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सशी केली जात आहे आता यावर खुद्द सूर्याने भाष्य केले आहे. सूर्याने स्पष्टपणे सांगितले की, जगात फक्त एकच मिस्टर 360 आहे. सूर्याच्या या विधानावरून मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

जगात फक्त एकच मिस्टर 360 आहे - सूर्या भारत-झिम्बाब्वे सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सूर्यकुमार यादवशी संवाद साधताना त्याच्या शॉट्सची तुलना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सशी केली. यादरम्यान स्कायच्या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली. तो म्हणाला, "जगात एकच 360 डिग्री खेळाडू आहे आणि मी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करत आहे." एकूणच डिव्हिलियर्स हा एकमेव  मिस्टर 360 खेळाडू असल्याचे सूर्याने म्हटले. 

डिव्हिलियर्सने केले कौतुक सूर्यकुमारने केलेल्या विधानाला आता डिव्हिलियर्सनेही प्रतिसाद दिला आहे. क्रिकेटच्या मैदानावर चारही दिशांना चौकार आणि षटकार मारून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय फलंदाजाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. मिस्टर 360ने सूर्याचे कौतुक करताना लिहले, "तु देखील तिथे वेगाने येत आहेस, आज तु खूप छान खेळलास." अशा शब्दांत डिव्हिलियर्सने सूर्याच्या खेळीचे कौतुक केले. 

लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजाने आतापर्यंत विश्वचषकाच्या स्पर्धेतील 5 सामन्यात 193.96 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा केल्या आहेत. खरं तर 3 अर्धशतकी खेळीच्या जोरावर सूर्याने एका वर्षात 1000 धावा करण्याच्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२सूर्यकुमार अशोक यादवएबी डिव्हिलियर्सभारतीय क्रिकेट संघ
Open in App