Join us

"१९००० मुलांसह स्टेडियममध्ये मॅच बघण्याचा आनंद ऐतिहासिक"; नीता अंबानींनी व्यक्त केल्या भावना

Mumbai Indians ESA Match, Nita Ambani Wankhede Stadium: अनेक लहान मुलांनी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पाहिली लाइव्ह मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:02 IST

Open in App

विराज भागवत

Mumbai Indians ESA Match, Nita Ambani Wankhede Stadium: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना खूपच खास ठरला. मुंबईच्या संघाने सामना जिंकला, त्यावेळी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील तब्बल १९,००० हून जास्त मुलांनी जल्लोष करत स्टेडियम दणाणून सोडले. मुंबई इंडियन्सच्या संघमालकीण नीता अंबानी यांनी 'एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल' (ESA initiative) या अंतर्गत या सर्व मुलांसोबत स्टेडियममध्ये बसून सामना पाहिला आणि त्यांच्यासोबत जल्लोषही केला.

१९ हजार मुलांसोबत लुटला सामन्याचा आनंद

"हा फक्त एक सामना नाही. हा आशा, स्वप्ने आणि आनंदाचा उत्सव आहे. संपूर्ण हंगामात हा MI चा आवडता सामना असतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टींपासून  वंचित असलेल्या आणि काही दिव्यांग असलेल्या अशा १९,००० मुलांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली. या मुलांमधील बहुतेकांसाठी स्टेडियममध्ये लाइव्ह सामना पाहण्याची ही पहिलीच वेळ. मुले कशी मजा करत आहेत हे पाहणे खरोखरच खूप भारी आहे. १९ हजार मुले, सुमारे ५०० बस आणि सुमारे १ लाख जेवणाचे बॉक्स असं सारं काही ही मुलं या स्टेडियममधून परतताना घेऊन जात आहेत याचा खूप आनंद आहे. मुंबई इंडियन्स आणि भारतासाठी खेळणारी अनेक मुले अशीच अतिशय सामान्य कुटुंबातून येतात. ही बाब साऱ्यांसाठी प्रेरणादायी असते. सर्वजण आशादायी स्वप्न पाहू शकतात आणि त्यांना जे व्हायचे आहे ते बनू शकतात," अशा भावना नीता अंबानी यांनी या मुलांसह मॅच पाहताना व्यक्त केल्या.

नीता अंबानी यांचा पालकांना सल्ला

नीता अंबानी यांना भेटून मुलांनाही आनंद झाला. मुलांशी संवाद साधल्यानंतर नीता अंबानी म्हणाल्या, "एका लहान मुलीने मला सांगितले की तिला बुमराहसारखे व्हायचे आहे, एक मुलगा म्हणाला त्याला रोहित शर्माशी हस्तांदोलन करायचे आहे. जर त्यांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकल्या, तर ते अख्खं जग जिंकू शकतात. ESA च्या केंद्रस्थानी सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा आहे. मला वाटते की मुले क्रीडा क्षेत्रात जितके शिकतात, तितकेच वर्गातही शिकतात. मला वाटते की हा दिवस स्वप्नांचा आणि आशांचा आहे. कदाचित त्यापैकी कोणी हरमनप्रीत बनू शकेल, कोणी रोहित शर्मा बनू शकेल. यातून मला मुलांच्या पालकांना हेच सांगायचे आहे की, मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या."

ESA म्हणजे नेमकं काय?

रिलायन्स फाउंडेशन (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची CSR शाखा) चा मुंबई इंडियन्सच्या सहकार्याने ESA हा एक प्रमुख उपक्रम आहे. २०१० मध्ये सर्व पार्श्वभूमीतील मुलांसाठी शिक्षण आणि क्रीडा सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून याची सुरूवात करण्यात आली. दरवर्षी, MI चा एक IPL सामना ESA गेम म्हणून निवडलेला असतो. याा खेळाला मुलांना स्टेडियममध्ये आणून सक्षम बनवण्याच्या, महत्त्वाकांक्षेला प्रेरित करण्याच्या आणि खेळ आणि शिक्षणाचा आनंद निर्माण करण्याच्या उपक्रमाच्या ध्येयाला प्रत्यक्षात उतरवले जाते. ESA मॅच व्यतिरिक्त, हा उपक्रम वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांना समर्थन देतो. सामान्य समुदायातील मुलांना ESA अंतर्गत शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अनुभव मिळतो.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सनीता अंबानीलहान मुलंरोहित शर्माजसप्रित बुमराह