नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील दरी सतत वाढत आहे. शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलला बनवण्याच्या मुद्द्यावरून कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गौतम गंभीर गिलला उपकर्णधार बनवण्याच्या विरोधात होते. पण रोहित ठाम राहिला आणि त्याला निवडकर्त्यांचाही पाठिंबा मिळाला, असे म्हटले जाते. कसोटी सामन्यांतील खराब कामगिरीनंतर भारतीय संघातील वाद हळू हळू बाहेर येत आहेत. आता गंभीर आणि कर्णधार रोहित यांच्यांत वादाची ठिणगी पडल्याचे वृत्त आहे.
पांड्याला करायचे होते उपकर्णधारवृत्तानुसार, शनिवारी दोन तास चाललेल्या निवड समितीच्या बैठकीत गौतम गंभीर हे अष्टपैलू हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्याच्या बाजूने होते. परंतु रोहित शर्माने पांड्याला विरोध केला. मुख्य निवडकर्ता अजित आगरकरही पांड्याला उपकर्णधारपद देण्याच्या विरोधात होते.
ऋषभ पंतच मुख्य यष्टिरक्षकहार्दिक पांड्या व्यतिरिक्त इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संजू सॅमसनच्या नावाचीही चर्चा झाली. गौतम गंभीर यांना मुख्य यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला संघात ठेवायचे होते पण कर्णधार रोहित शर्मा ऋषभ पंतवर ठाम राहिला. पंत आता संघाचा मुख्य यष्टिरक्षक असेल, तर केएल राहुल अतिरिक्त असेल. सॅमसनला संघात स्थान देण्यात आले नाही. तथापि, असेही मानले जाते की संजू सॅमसन विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता, ज्यामुळे त्याला एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. तो इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात आहे.