नवी दिल्ली : रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर झटपट क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मासारखे युवा खेळाडू त्यांची जबाबदारी घेण्यास सज्ज आहेत. युवा खेळाडूंचा हा बेधडकपणा शानदार असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा आणि पंजाब संघाचा अष्टपैलू मार्क्स स्टोइनिस याने व्यक्त केली.
पंजाबचा युवा फलंदाज प्रियांश आर्य याने पहिल्याच सामन्यात आक्रमक फटकेबाजीने अनेकांचे लक्ष वेधले. याविषयी स्टोइनिस म्हणाला, 'भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्ता खोलवर आहे. याचे कारण पायाभूत सुविधा तसेच स्पर्धात्मक वातावरण. भारतीयांना जागतिक स्तरावर कौशल्य दाखविण्याची नियमितपणे संधी मिळते. त्यामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारलेला असतो.'. तसेच, 'या युवा खेळाडूंना कारकिर्दीच्या सुरुवातीला आयपीएलसारख्या लीगमधून दडपणाचा यशस्वी सामना करण्याची संधी मिळते. खेळात बेधडक वृत्ती बाळगणे कधीही लाभदायी ठरते,' असेही स्टोइनिसने म्हटले.