Join us

तुला माझे म्हणवण्याचा खूप अभिमान वाटतो; पती रोहितचा संघर्ष मांडताना पत्नी रितीका भावुक

 ritika sajdeh and rohit sharma : रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहने एक भावनिक पोस्ट केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:18 IST

Open in App

Ritika Sajdeh's emotional Instagram post for Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब उंचावला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. खरे तर २००७ नंतर प्रथमच भारताला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक जिंकता आला आहे. तब्बल १३ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जात आहे. आता भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिने आपल्या पतीसाठी एक खास पोस्ट केली आहे. 

रितीकाने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, रो, मला माहित आहे की याचे (विश्वचषक) तुझ्यासाठी महत्त्व काय आहे. हा फॉरमॅट, हा विश्वचषक, ही माणसे आणि हा प्रवास... याचे तू नेहमीच स्वप्न पाहिले होते. हे गेल्या काही महिने तुझ्यासाठी किती कठीण गेले हे मला माहीत आहे. तुझ्या मनावर, हृदयावर आणि शरीरावर किती परिणाम झाला आहे हे मला ठाऊक आहे. पण तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना पाहणे हे खूप भावनिक आणि प्रेरणादायी होते. तुझी पत्नी या नात्याने... तू जे साध्य केले आहेस आणि या खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांवर तू ज्या प्रकारे प्रभाव पाडला आहेस... याचा खूप अभिमान वाटतो. तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांपैकी काहींना खूप वाईट वाटले असेल. कारण तू या खेळाच्या काही भागातून वेगळा झाला आहेस. मला माहिती आहे तू संघासाठी काय सर्वोत्कृष्ट आहे याबद्दल कठोर विचार केला आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुला माझे म्हणवण्याचा खूप अभिमान वाटतो.

२०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचं दुःख अखेर त्याच्या मनातून दूर झाले असावे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी आफ्रिकेच्या हातातून सामना खेचून आणला. सूर्यकुमार यादने २०व्या षटकात घेतलेला कॅच आफ्रिकेच्या पराभवासाठी पुरेसा ठरला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. ६ चेंडूंत १६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला.  

टॅग्स :रोहित शर्मापती- जोडीदारभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024प्रेरणादायक गोष्टी