Gautam Gambhir, IND vs ENG ODI Series : "टी-२० क्रिकेटमध्ये अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी धोका पत्करून आक्रमक शैली कायम ठेवण्याची रणनीती आम्ही कायम राखणार आहोत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने २५०हून अधिक धावा उभारण्याचे आमचे लक्ष्य आहे," असे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी म्हटले. रविवारी इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकल्यानंतर गंभीर म्हणाले, "आम्ही टी-२० क्रिकेट अशाचप्रकारे खेळू इच्छितो. आम्हाला पराभवाची भीती बाळगायची नाही. आम्हाला अधिक धोका पत्करून सकारात्मक निकाल मिळवणारे क्रिकेट खेळायचे आहे. आमच्या खेळाडूंनी या शैलीला चांगल्याप्रकारे आत्मसात केले आहे."
संघाच्या आक्रमक रणनीतीबाबत गंभीर म्हणाले की, 'टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने २५०हून अधिक धावा उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे करण्याच्या प्रयत्नात कधीकधी आम्ही १२०-१३० धावांवरही गारद होऊ शकतो. हेच टी-२० क्रिकेट आहे. जोपर्यंत अधिक धोकादायक क्रिकेट खेळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित निकालही मिळणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत.
श्रेय अभिषेकला : बटलर
'नक्कीच रविवारी झालेल्या सामन्याद्वारे आमच्या पदरी निराशा आली. भारताने शानदार फलंदाजी केली आणि माझ्या मते याचे श्रेय अभिषेक शर्माला जाते. त्याची ही खेळी जबरदस्त आणि सर्वोत्तम क्लीन हिटिंगपैकी होती,' असे इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने सांगितले. अभिषेकने रविवारी अखेरच्या टी-२० सामन्यांत केवळ ३७ चेंडूंत शतक ठोकत भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली होती.