भारतीय संघाचा आधारस्तंभ, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत विक्रमांची शिखरं सर करणारा शिलेदार आणि 'जगात भारी' मानल्या जाणाऱ्या क्रिकेटवीरांमधला एक महान खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भातील बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली होती. बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंतीही केली होती. पण विराट कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत विराट कोहलीनं ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ७ द्विशतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खास पोस्टमध्ये काय म्हणाला कोहली?
आज कसोटी क्रिकेटमध्ये १४ वर्षांचा प्रवास पूर्ण झाला. व्हाइट कपड्यांमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले त्यावेळी हा प्रवास एवढा मोठा असेल याची कल्पनाही केली नव्हती. क्रिकेट कारकिर्द बहरण्यात कसोटी हा महत्त्वाचा भाग होता. इथं खूप काही शिकलो. कसोटी खेळणं हा एक वेगळाच अनुभव होता. या प्रवासातील छोटे मोठे क्षण कायम आठवणीत राहतील. आता या प्रकारातून निवृत्ती घेतोय. हा निर्णय घेणं सोपे नव्हते. पण हीच योग्य वेळ वाटते. मी जेवढे दिले त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक मला कसोटी क्रिकटमधून मिळाले. अशा आशयाच्या भावनिक शब्दांत त्याने कसोटी क्रिकेटमधून थांबतोय असे सांगितले आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द
विराट कोहलीनं २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यात ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.