भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या इंग्लंड विरुद्धच्या आगामी मालिकेसाठी कसून सराव करताना दिसत आहे. २२ जानेवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी पाहायला मिळाला हार्दिक पांड्याला डावलण्यात आल्याचा सीन
हार्दिक पांड्याला टी-२० संघात स्थान मिळाले. पण त्याला डावलून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या उप कर्णधारपदी अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. ही गोष्ट हार्दिक पांड्यासाठी एक धोक्याची घंटाच आहे. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियातील आपले स्थान भक्कम करण्याची मोठी कसोटी त्याच्यासमोर असेल. ही गोष्ट लक्षात घेऊनच ३१ वर्षीय हार्दिक पांड्या फिटनेसवर भर देताना दिसतोय.
पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याचे चॅलेंज
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी रंगलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत बडोदा संघाकडून मैदानात उतरला होता. एवढेच नाही तर त्याने ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही भाग घेतला होता. पण या स्पर्धेत तो फारच कमी सामने खेळला. तो प्रत्येक सामन्यात का खेळताना दिसला नाही. त्यामुळे पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरुन पुन्हा आपला फिटनेस सिद्ध करण्याचे चॅलेंज त्याच्यासमोर असेल. हे चॅलेंज पार करण्यासाठी त्याने कंबरही कसली आहे.
हार्दिक पांड्याने शेअर केला खास व्हिडिओ
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो हाय इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) सेशनवर फोकस करताना दिसून येते. व्यायामाचा हा एक लोकप्रिय प्रकार आहे. कमी वेळात वेगवेगळ्या व्यायामाचा एकत्रित सराव या व्यायाम प्रकारात केला जातो. हा व्यायाम कमी वेळात अधिक दमायला लावणारा असा आहे. फिटनेस स्तर उंचावण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय व्यायाम प्रकार मानला जातो.
टी-२० संघातील स्थान कायम, वनडे संघात एन्ट्री होणार का?
भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून रंगणार आहे. या मालिकेसाठी निवड झालेल्या हार्दिक पांड्याची १९ फेब्रुवारी पासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड होणार का? हा देखील एक चर्चेचा मुद्दा आहे. २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्या टीम इंडियाकडून शेवटचा वनडे सामना खेळला होता. दुखापतीमुळे त्याला अर्ध्यातूनच ही स्पर्धा सोडावी लागली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून तो वनडे संघात कमबॅक करणार की, तो फक्त टी-२० पुरताच मर्यादीत राहणार ते पाहण्याजोगे असेल.