शेफाली वर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. शफालीने केवळ सामनाच जिंकवून दिला नाही, तर स्मृती मानधनाला मागे टाकत एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.
या साम्यात शफाली वर्माने टीम इंडियासाठी ६९ धावांची मॅचविनिंग धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाने १२९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. शेफालीने ३४ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह सुमारे २०३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या, त्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यासह, शफालीने टी-२० क्रिकेटमध्ये आठव्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. या कामगिरीसह तिने स्मृती मानधनाला मागे टाकले.
स्मृती मानधनाने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सात वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनीही प्रत्येकी सात वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. माजी भारतीय कर्णधार मिताली राज यादीत अव्वल आहे, त्यानंतर हरमनप्रीत कौर दुसऱ्या स्थानावर आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत १२ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने आतापर्यंत ११ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर शेफाली काय म्हणाली?
सुरुवातीला चेंडू थोडा थांबून येत होता म्हणून मी एकेरी धावांवर भर दिला. प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार मी खेळ केला. ही खेळी माझ्यासाठी खास होती कारण मी स्वतःला शांत ठेवले. चेंडू जास्त उंच मारण्याऐवजी ग्राउंड शॉट्स खेळण्यावर मी लक्ष केंद्रित केले, कारण मला माहित आहे की, त्यातूनही धावा निघू शकतात."
भारताची मालिकेत २-० अशी आघाडी
दुसऱ्या टी-२० मध्ये, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावा केल्या आणि भारतासमोर १२९ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून वैष्णवी आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाने हे लक्ष्य फक्त ११.५ षटकांत पूर्ण केले. टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.