Champions Trophy 2025 Points Table : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या ( IND vs BAN ) संघाला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली. भारताविरूद्ध ( Team India ) प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ( Bangladesh ) तौहिद हृदयचे शतक आणि जाकर अलीच्या अर्धशतकाच्या बळावर ४९.४ षटकांत सर्वबाद २२८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने नाबाद शतक आणि रोहित, राहुलच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताने हा सामना ४६व्या षटकातच जिंकला. भारताने सहज विजय मिळवूनही न्यूझीलंड ( New Zealand ) अव्वल राहिला असून पाकिस्तानची ( Pakistan ) आणखी पिछेहाट झाली आहे.
विजय मिळवूनही भारत दुसरा का?
या विजयानंतरही टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचू शकली नाही. गट अ मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात किवी संघाने पाकिस्तानला ६० धावांनी पराभूत केले होते. भारताप्रमाणे त्यांचेही १ सामन्यात २ गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट खूपच चांगला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशने अद्याप खाते उघडलेले नाही. त्यामुळे दोघे तळाशी आहेत. त्यातही बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. पराभूत होऊनही बांगलादेशी संघाचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्याने ते तिसरे आहेत.
संघ | सामने | विजय | पराजय | गुण (नेट रन रेट) |
---|---|---|---|---|
न्यूझीलंड | १ | १ | - | २ (+ १.२००) |
भारत | १ | १ | - | २ (+ ०.४०८) |
बांगलादेश | १ | - | १ | ० (- ०.४०८) |
पाकिस्तान | १ | - | १ | ० (- १.२००) |
दरम्यान, बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीत अप्रतिम सुरुवात केली होती. अवघ्या ३५ धावांत बांगलादेशचे ५ गडी बाद झाले होते. पण तौहिद हृदय आणि जाकेर अली या दोघांच्या भागीदारीने बांगलादेश सावरला. हृदयने ११८ चेंडूत १०० धावा केल्या तर जाकेर अलीने ११४ चेंडूत ६८ धावा केल्या. या दोघांमुळे बांगलादेशला २२८ धावा करता आल्या. भारताने २२९ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. रोहित शर्माने ४१ धावा केल्या. विराट कोहलीने २२ धावा केल्या तर लोकेश राहुलने नाबाद ४१ धावांची खेळी केली. शुबमन गिल सलामीला आणि नाबाद राहिला. त्याने १२९ चेंडूत १०१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.