Join us

टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Rohit Sharma Record, IND vs BAN 1st Test: भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये १६ वर्षात पहिल्यांदा असा प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 21:37 IST

Open in App

Rohit Sharma Record, IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटी सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. दुसरा दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ४७ षटकांत आटोपला. पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ३ बळी गमावले. त्यात कर्णधार रोहित शर्माच्या विकेटचाही समावेश होता. या सामन्याच्या दोन्ही डावात रोहित फ्लॉप झाला. त्यामुळेच एक लाजिरवाणा विक्रम रोहितच्या नावे झाला.

तब्बल १६ वर्षांनी घडला असा प्रकार

एक फलंदाज म्हणून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी चेन्नई कसोटी फारशी खास ठरली नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितला १९ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. त्याचवेळी दुसऱ्या डावातही अशीच परिस्थिती आली. तो ७ चेंडूत ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. म्हणजेच या कसोटी सामन्याच्या एकाही डावात रोहितला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मायदेशातील कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात एकेरी धावसंख्येवर बाद होणारा रोहित गेल्या १६ वर्षांतील पहिला भारतीय कर्णधार ठरला.

तसेच २०१५ नंतर पहिल्यांदा रोहित घरच्या कसोटीच्या दोन्ही डावात एकेरी धावसंख्येवर बाद झाला. कसोटी क्रिकेटमधील मात्र ही त्याच्या कारकिर्दीतील ही केवळ चौथी वेळ आहे. याआधी २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी सामन्यात तो दोन्ही डावात एक अंकी धावसंख्येवर बाद झाला होता.

दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत ३७६ धावा केल्या. रवीचंद्रन अश्विनने पहिल्या डावात शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर आटोपला. बांगलादेशच्या डावात एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३ बाद ८१ धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माबांगलादेश