Gautam Gambhir at Siddhivinayak Temple Mumbai: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२६ मध्ये उद्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जेतेपद उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्नशील असेल. यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील एक पराभव सोडला तर प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. पण अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक आले, पण ज्या फटकेबाजीची अपेक्षा होती, ते त्याला जमलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी कोच गौतम गंभीर यांनीही बाप्पाच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक होत, संघाच्या विजयासाठी साकडे घातले.
भारतीय संघाचे कोच गौतम गंभीर गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरत आहेत. टी२० विश्वचषक ही अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी भारतीय संघात बदल केले जातात. या बदलांमुळे अनेकदा खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमी निर्माण होते आणि त्यांच्या कामगिरीवर परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे संघात सातत्याने करण्यात येणाऱ्या बदलामुळे गौतम गंभीरवर क्रिकेटवर्तुळातून टीकेचा भडीमार केला जात आहे. याचदरम्यान, टीम इंडियाच्या सामन्यासाठी मुंबईत आलेल्या गौतम गंभीरने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्याची पत्नी आणि दोन्ही मुलीही त्याच्यासोबत होत्या. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार अक्षर पटेल, सलामीवीर अभिषेक शर्मासह ईशान किशनची झलकही पाहायला मिळते. या तिघांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली. अभिषेक शर्माशिवाय ईशान किशन आणि अक्षर पटेल हे देखील संघातील प्रमुख खेळाडू आहेत. उपकर्णधार अक्षर पटेल गोलंदाजी आणि फलंदाजीत उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय ईशान किशनवर आघाडीच्या फळीत संघाला शानदार सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदारी असेल.