चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियातील स्टार खेळाडू रणजी करंडक स्पर्धेच्या मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती करण्यात आलीये. बीसीसीआयची ही युक्ती टीम इंडियाला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी फायद्याची ठरेल, असे बोलले जात होते. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात एका पाठोपाठ एक अशी पाच स्टार चेहऱ्यांनी नांगी टाकली. हे चित्र चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचं कसं होणार? असा प्रश्न निर्माण होणारे आहे. कारण रणजी मॅचमध्ये सपशेल अपयशी ठरले हे चेहरे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेल्या टीम इंडियातील प्रमुख खेळाडू आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली संघाकडून रिषभ पंतचा खेळ अवघ्या एका धावेवर खल्लास
रणजी करंडक स्पर्धेतील एलिट ग्रुप डीमध्ये दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील लढत रंगली आहे. या सामन्यात भारतीय संघातील स्टार बॅटर आणि विकेट किपर रिषभ पंत दिल्लीच्या ताफ्यातून मैदानात उतरला. आपल्या धमाकेदार खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतला रणजी सामन्यात संघ अडचणीत असताना छाप सोडता आली नाही. अनकॅप्ड डीए जडेजानं अवघ्या एका धावेवर पंतला माघारी धाडले. पंत हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग आहे.
शुभमन गिलसह त्याच्या संघावर नामुष्की
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पंजाबच्या संघानं नेतृत्व करणाऱ्या शुबमन गिललाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. कर्णधार शुबमन गिल ८ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघावर ५० धावांत ऑलआउट होण्याची नामुष्की ओढावली.
मुंबईच्या ताफ्यातून तिघांचा फ्लॉप शो
मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात वर्णी लागलेल्या यशस्वी जैस्वाल यालाही चार धावांची भर घालून तंबूत परतला. एवढेच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात वर्णी लागलेल्या श्रेयस अय्यरनं दुहेरी आकडा गाठला. ११ धावांवर तोही बाद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी ज्यांच्यावर भरवसा दाखवलाय त्यांचा देशांतर्गत क्रिकेटमधील खेळ पाहून टीम इंडियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीत कसं होणार? असा प्रश्नच पडतो.
Web Title: team india champions trophy squad Star Rishabh Pant Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Shreyas Iyer Flop Show In Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.