Join us

Mohammed Siraj ला घर आणि सरकारी नोकरी मिळणार; तेलंगणा सरकारची मोठी घोषणा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोहम्मद सिराजचे अभिनंदन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:09 IST

Open in App

भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिलेल्या मोहम्मद सिराजलातेलंगणा सरकारने घर आणि सरकारी नोकरी देणार असल्याची घोषणा केली. मंगळवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सिराजला भेटीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल सिराजचे अभिनंदन केले. 

मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी घोषणा करताना म्हटले की, मोहम्मद सिराज ज्याने भारत देशाला आणि आपल्या तेलंगणा राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कीर्ती मिळवून दिली आहे. T20 World Cup 2024 जिंकून हैदराबादला आलेल्या सिराजने शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सिराजचा गौरव करण्यात आला. विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सिराजचे कौतुक केले. अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने सिराजला घर आणि सरकारी नोकरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हैदराबाद किंवा आसपासच्या भागात योग्य जागा शोधावी तसेच सरकारी नोकरी देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले आहे. या बक्षिसाचा लाभ खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. 

दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. 

टॅग्स :मोहम्मद सिराजट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024तेलंगणामुख्यमंत्रीभारतीय क्रिकेट संघ