T20 World Cup 2024 : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने सुरुवात करताना आयर्लंडवर मात दिली. आता भारताचा पुढील सामना ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यामुळे सध्या टीम इंडियाचे खेळाडू व सपोर्ट स्टाफ थोडं रिलॅक्स दिसत आहेत. काल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व सपोर्ट स्टाफने बेसबॉल मॅचचा आनंद लुटला आणि आज द्रविड व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यू यॉर्क येथे आदरांजली वाहिली.
या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर द्रविड टीम इंडियासोबत राहणार नाही. त्याने मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. द्रविडने नोव्हेंबर २०२१ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडून भारतीय संघाची सूत्रे हाती घेतली. द्रविडच्या कार्यकाळात भारताने १७ पैकी १४ ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या. यात इंग्लंड व न्यूझीलंड येथील मालिकांचाही समावेश आहे. १४ पैकी १० वन डे मालिका आणि ८ पैकी ६ कसोटी मालिका भारताने या काळात जिंकल्या.
रोहित शर्मा इमोशनल...
''तो माझा पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार होता. आम्ही त्याला खेळताना पाहिले. तो आपल्या सर्वांसाठी एक उत्तम आदर्श आहे. गेल्या काही वर्षांत त्याने संघासाठी खूप काही केले. आम्ही त्याच्यासोबत जवळपास सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या. आम्हाला हे करायचे आहे, हे संघासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगणारा तो पहिला व्यक्ती आहे. मी वैयक्तिकरित्या त्याला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याच्या स्वतःच्या प्राधान्यक्रम आहेत. मी त्याला जाताना पाहू शकणार नाही,''असे सांगताना रोहित शर्मा भावनिक झाला.