Join us

"थँक्यू सर...", मोदींनी हिटमॅनला शुभेच्छा दिल्या; रोहितने त्याच्या शैलीत मानले पंतप्रधानांचे आभार

Rohit Sharma On Narendra Modi : भारतीय कर्णधार रोहित शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:40 IST

Open in App

Rohit Sharma Latest News : टीम इंडियाने २०२४ चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियाचे कौतुक होत आहे. चाहत्यांपासून माजी खेळाडू ते पंतप्रधान नरेंद्र यांनी देखील रोहितसेनेच्या खेळीला दाद दिली. भारताने सामना जिंकताच पंतप्रधान मोदी यांनी कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. त्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता कर्णधार रोहितने मोदींचे आभार मानले असून विश्वचषक विजयाचा सर्वत्र आनंद साजरा केला जात असल्याचे नमूद केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या शुभेच्छांच्या पोस्टवर व्यक्त होताना रोहितने सांगितले की, तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद सर... चषक घरी आणू शकलो याचा मला आणि संघाला खूप अभिमान वाटतो. तसेच विश्वचषक आपल्या घरी परतल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर असल्याचे पाहून खूप आनंद झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले होते की, तुझे व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे. तुझी आक्रमक खेळी करण्याची शैली, फलंदाज आणि कर्णधार म्हणून केलेली कामगिरी यामुळे भारतीय संघाला नवी ओळख मिळाली आहे. तुझी ट्वेंटी-२० कारकीर्द कायम लक्षात राहील. आज तुझ्याशी बोलून आनंद झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब उंचावला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. खरे तर २००७ नंतर प्रथमच भारताला क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक जिंकता आला आहे. तब्बल १३ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सर्वत्र साजरा केला जात आहे. 

अटीतटीच्या लढतीत अखेरच्या षटकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह यांची घातक गोलंदाजी... याशिवाय सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा घेतलेला अप्रतिम झेल यामुळे सामन्याचा निकाल बदलला. 

टॅग्स :रोहित शर्माट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघनरेंद्र मोदी