Join us

वर्ल्ड चॅम्पियन्स बार्बाडोसहून निघाले; वाचा Team India भारतात कुठे आणि केव्हा पोहोचणार?

भारतीय संघ मायदेशात कधी परतणार याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:28 IST

Open in App

Team India Return From Barbados : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकणारा भारतीय संघ मायदेशात कधी परतणार याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. तब्बल १३ वर्षांनंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली आहे. भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण अगदी जवळ आला आहे. कारण टीम इंडिया विशेष विमानाने दिल्लीला पोहोचेल. एअर इंडियाचे AIC24WC नावाचे विशेष चार्टर विमान भारतीय संघ, त्यांचे सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे कुटुंबीय आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अधिकारी तसेच भारतातील माध्यमांच्या प्रतिनिधींना परत आणण्यासाठी सज्ज आहे. बार्बाडोसमध्ये वादळ असल्याकारणाने भारताचे शिलेदार मागील तीन दिवसांपासून तिथे अडकून होते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शनिवारी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथून २ जुलै रोजी उड्डाण घेतलेले हे विमान (AIC24WC) स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता बार्बाडोसला पोहोचणे अपेक्षित आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विमान बार्बाडोसहून पहाटे ४.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण करणार असल्याचे सांगितले जात आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे पोहोचायला १६ तास लागतात. त्यामुळे टीम इंडिया गुरुवारी सकाळी सहा वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीत उतरेल. पण, विमानाच्या उड्डाणास वेळ लागल्यास उशीरही होऊ शकतो. अशी माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. 

दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माबीसीसीआयविमान