T20 World Cup Ind vs Pak: आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने वर्ल्ड कममध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेट संघाला मान्यता दिली आहे. मात्र, या मंजुरीसोबत एक महत्त्वाची अट घातली आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विटद्वारे ही घोषणा करण्यात आली. सरकारी आदेशानुसार, पाकिस्तान क्रिकेट संघ 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. म्हणजेच काय, तर पाकिस्तान स्पर्धेत सहभागी होईल, परंतु बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार नाही.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हाय-व्होल्टेज सामन्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड(आयसीसी)ला आर्थिक नुकसान पोहोचवण्याच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे मानले जाते. अलिकडेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वीने आयसीसीवरबीसीसीआयच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि मोहसिन नक्वी यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर काही मिनिटांतच ही घोषणा करण्यात आली. नक्वी यांनी यापूर्वी पंतप्रधानांची भेट घेतली होती आणि सांगितले होते की, टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय 2 फेब्रुवारीपर्यंत घेतला जाईल. आता अखेर पाकिस्तानने स्पर्धेत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे, मात्र भारताविरोधात असल्याच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. आता आयसीसी काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
टी-20 वर्ल्ड कप सामने आणि वेळापत्रक
पाकिस्तान गट ‘A’ मध्ये असून त्यांच्यासोबत भारत, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका हे संघ आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत (भारतासोबत सह-यजमान) होणार आहेत.
पाकिस्तानचे सामने
7 फेब्रुवारी: नेदरलँड्सविरुद्ध (स्पर्धेचा उद्घाटन सामना)
10 फेब्रुवारी: अमेरिकेविरुद्ध
15 फेब्रुवारी: भारताविरुद्ध (बहिष्कार)
18 फेब्रुवारी: नामिबियाविरुद्ध
भारताविरुद्धचा सामना न खेळल्यास पाकिस्तानला थेट दोन गुण गमवावे लागतील.