Syed Mushtaq Ali Trophy 2025 Robin Minz Maiden Fifty For Jharkhand vs Rajasthan : BCCI अंतर्गत घेण्यात येणाऱ्या देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत अनेक भारतीय स्टार चमकत आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गाववाल्याची भर पडली आहे. झारखंडचे प्रतिनिधीत्व करताना रॉबिन मिंझ याने राजस्थानविरुद्ध वादळी खेळीचा नजराणा पेश केला आहे.
२०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह ठोकली पहिली फिफ्टी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील राजस्थान विरुद्धच्या एलिट गटातील लढतीत युवा विकेट किपर बॅटर रॉबिन मिंझ याला बॅटरच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २२ चेंडूत या स्पर्धेतील पहिले वहिले अर्धशतक साजरे केले. या सामन्यात त्याने २७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१४ च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्याचे पाहायला मिळाले. या वादळी खेळीसह त्याने झारखंडच्या विजयात मोलाचा वाटा तर उचललाच. पण IPL मधील मुंबई इंडियन्सच्या संघाने दाखवलेल्या विश्वासही त्याने सार्थ ठरवला आहे.
CSK ला मात देत MI नं या खेळाडूवर खेळला होता स्वस्ता मस्त डाव
रॉबिन मिंझ हा डावखुऱ्या हाताने स्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज आहे. विकेटमागेही तो सर्वोत्तम योगदान देऊ शकतो. २०२४ च्या लिलावात गुजरात टायटन्सच्या संघाने २० लाख मूळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी ३ कोटी ६० लाख एवढी बोली लावली होती. पण अपघातामुळे तो आयपीएल हंगामाला मुकला. २०२५ च्या मेगा लिलावात ३० लाखासह पुन्हा तो लिलावात उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी धोनीच्या CSK सह GT च्या संघाने त्याला संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. पण मुंबई इंडियन्सच्या संघाने फायनल बाजी मारली. ६५ लाख रुपयात MI नं या खेळाडूला आपल्या संघात घेतले होते. २०२६ च्या हंगामाआधी रिटेन रिलीजच्या खेळात MI नं त्याला संघात कामय ठेवण्याचा निर्णय घेतला. आता या पठ्ठ्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील हिट शोसह आगामी हंगामात MI च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, अशी कामगिरी करुन दाखवली आहे.