आयपीएल मेगा लिलावाआधी श्रेयस अय्यरच्या भात्यातून आणखी एक मोठी खेळी आल्याचे पाहायला मिळाले. देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील गोवा विरुद्धच्या टी-२० लढतीत त्याने ४७ चेंडूत शतक साजरे केले. या सामन्यात अय्यरनं २२८.०७ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढताना चौकार षटकारांची आतषबाजीच केली. त्याने आपल्या ५७ चेंडूतील नाबाद १३० धावांच्या खेळीत ११ चौकार आणि १० षटकार मारले.
KKR ला चॅम्पियन करूनही मिळाला नारळ, आता...
गत आयपीएल हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाची कॅप्टन्सी करताना दिसला होता. त्याने आपल्या नेतृत्वात संघाला चॅम्पियन केले. पण तरीही या संघाने त्याला रिलीज केले होते. मेगा लिलावात कॅप्टन्सी आणि सर्वोत्तम बॅटरच्या रुपात अनेक फ्रँचायझीच्या त्याच्यावर नजरा असतील. त्यात कडक सेंच्युरीमुळं आता त्याचा भाव आणखी वाढू शकतो.
पृथ्वीसोबत अर्धशतकी भागीदारी, शेवटपर्यंत मैदानात थांबून गोवा संघासमोर उभारला धावांचा डोंगर
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघानं गोवा विरुद्धच्या लढतीनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात केली. पहिल्यंदा बॅटिंग करताना मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी संघाच्या डावाची सुरुवात केली. रघुवंशी अवघ्या ६ धावावर माघारी फिरल्यावर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात उतरला. सलामीवीर पृथ्वीसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. पृथ्वी २२ चेंडूत ३३ धावा करुन परतल्यावर कॅप्टन श्रेयस अय्यरनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.
अर्जुन तेंडुलकर ठरला महागडा
अजिंक्य राहणे १३ धावा करून परतल्यावर शम्स मुल्लानी याने ४१ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. अय्यर शतकी खेळी करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघानं निर्धारित २० षटकात २५० धावा केल्या. एका बाजूला मेगा लिलावाआधी श्रेयस अय्यरनं धमाका केला. दुसऱ्या बाजूला गोवा संघाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीत अपयशी ठरला. त्याने ४ षटकात १२ च्या सरासरीने ४८ धावा खर्च केल्या.