Join us

SMAT: अजिंक्य रहाणेचा धमाका! ११ चौकार, ५ षटकारांची आतषबाजी, मुंबईची फायनलमध्ये धडक

Ajinkya Rahane, SMAT 2024 Mumbai vs Baroda : अजिंक्य रहाणेचे ७ पैकी ५ सामन्यात अर्धशतकी खेळी, आज २ धावांनी हुकलं शतक, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:48 IST

Open in App

Ajinkya Rahane, SMAT 2024 Mumbai vs Baroda : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy 2024) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याचा सामना मुंबईशी झाला. अजिंक्य रहाणेची झंझावाती खेळी (९८) आणि कर्णधार श्रेयस अय्यरची छोटेखानी उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली. रहाणेला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) समावेश असलेल्या बडोद्याने प्रथम खेळताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने १७.२ षटकांत ४ गडी गमावत १६४ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला. अजिंक्यने मुंबईच्या संघासाठी एक खास विक्रमही केला.

अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे मुंबई फायनलमध्ये!

रहाणेने बडोद्याविरुद्ध मुंबईसाठी तडाखेबाज खेळी केली. त्याने अवघ्या ५६ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ९८ धावा केल्या. या सामन्यात रहाणे आपले शतक पूर्ण करण्यापासून अवघ्या २ धावा दूर होता आणि मुंबईलाही विजयासाठी २ धावा करायच्या होत्या. त्याच वेळी अभिमन्यू सिंगने एक चेंडू वाईड टाकला. यानंतर रहाणेने मोठा फटका मारून शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झेलबाद झाला. मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ४६ धावांची दमदार खेळी केली. सूर्यकुमार यादव मात्र अवघ्या एक धावेवर बाद झाला.

मुंबईकडून खेळताना रहाणेचा विक्रम

अजिंक्य रहाणे गेल्या काही सामन्यात दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. अजिंक्य रहाणेने यंदाच्या SMAT स्पर्धेत ७ सामने खेळले. त्यात ६२च्या सरासरीने आणि तब्बल १७०च्या स्ट्राईक रेटने ४३२ धावा केल्या. ७ पैकी ५ डावात त्याने अर्धशतकी धावसंख्या गाठली. आजच्या सामन्यातील ९८ धावा ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. आजच्या 'फिफ्टी प्लस' धावसंख्येसह अजिंक्य रहाणेने मुंबई संघाकडून खेळताना नवा विक्रम केला. मुंबई संघातून टी२० सामने करताना त्याने १२ वेळा 'फिफ्टी प्लस' धावा केल्या. याबाबतीत त्याने मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर (११) याला मागे टाकले.

बडोदा OUT; हार्दिक पांड्याही चालला नाही!

बडोद्याने पहिल्या डावात फलंदाजी केली, मात्र हार्दिक पांड्या या सामन्यात छाप पाडू शकला नाही. अवघ्या ५ धावा करून तो बाद झाला. या संघाचा कर्णधार कृणाल पांड्यानेही ३० धावा केल्या तर सलामीवीर फलंदाज शाश्वत रावतने ३३ धावांची खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाज शिवालिक शर्माने २४ चेंडूत नाबाद ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली तर अतित सेठने १४ चेंडूत २२ धावा केल्या. त्यामुळे त्यांनी दीडशेपार मजल मारता आली. पण ती धावसंख्या विजयासाठी तोकडीच पडली.

टॅग्स :अजिंक्य रहाणेमुंबईश्रेयस अय्यरहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यासूर्यकुमार अशोक यादव