भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये मोठा डाव साधला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाकडून खेळताना मध्य प्रदेशच्या संघानं सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवनं तुफान फटकेबाजी केली. ३५ चेंडूत सूर्यानं ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत सूर्यानं टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले.
अन् सूर्यकुमार यादवनं MS धोनीला टाकले मागे
सूर्यकुमार यादवनं ३०४ टी -२० सामन्यात आतापर्यंत ३३९ षटकार मारले आहेत. छोट्या फॉर्मेटमध्ये मोठी फटकेबाजी करताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितच्या खात्यात एकूण ५२५ षटकारांची नोंद आहे. त्यापाठोपाठ या यादीत ४१६ षटकारांसह विराट कोहलीचा नंबर लागतो. MS धोनीने टी-२० मध्ये आतापर्यंत ३३८ षटकार मारले आहेत. संजू सॅमसन ३३४ षटकारांसह टॉप ५ मध्ये आहे.